‘झुलता पूल’ ही या संग्रहातील एक महत्त्वाची एकांकिका. या एकांकिकेबद्दल सुप्रसिद्ध नाटककार आणि नाट्यसमीक्षक राजीव नाईक यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. ते म्हणतात, “पुष्कळशा मिथक कथा कुठल्या तरी वस्तुस्थितीचं स्पष्टीकरण करू पाहातात. तशी सत्यनारायण पूजेच्या संदर्भातली नवकल्पित कथा इथे येते. एक नदी ह्या शहराचं दोन भागांत विभाजन करते हे भौगोलिक सत्य एक सामाजिक-मानसिक विभाजनदेखील कसं ठरतं, हे ठसवणारी कथा. दैविक-स्तुतीची टर उडवत, उलटकरण साधू इच्छित कथा सांगितली जाते..
… या एकांकिकेत दोन अवकाश आहेत. हे दोन अवकाश भौगोलिक आहेत तसे आर्थिक मिती असलेलेही आहेत. आर्थिकतेमुळे सामाजिकता ठरली आहे. दोन्ही अवकाश उच्चवर्णीयच असावेत. ह्या आर्थिकतेने ठरलेल्या सामाजिकतेमुळे मानसिकदृष्ट्याही हे अवकाश निराळे होतात. इथे जन्म-जातीचा संबंध नाही. विशिष्ट संस्कृतींना जन्म देणारी आर्थिकता ठसते; पण ही आर्थिक मिती शिक्षणामुळे, पेशामुळे आहे, भौतिक ध्येयं आणि मूल्यं ह्यातल्या बदलांमुळे आहे. हे विभाजन ठळक आहे, ढोबळही आहे. हे दोन्ही अवकाश मध्यमवर्गीयच आहेत; एक जरा वरचा आणि एक जरा खालचा.
…ह्यातल्या दोन अवकाशांत फरक आहे, पण त्यात झुलता का होईना पूलही आहे. वर्ग, वर्ण, जात, धर्म, भाषा, प्रांत, स्वयंपाक, विचारसरणी ह्यात टोकाचा फरक नाही. हे दोन जीव एकत्र आले तर समाज हादरणार नाही. पण हा किंचितसा फरकच खूप होतो. हळहळ किंचितपणातच आहे; म्हणूनच ती फुटत नाही, ठुसतठुसत राहते. कुठल्या का कारणाने होईना दोन सामाजिक अवकाशातल्या मुलामुलींचे वैयक्तिक अवकाश जरासे मिळाल्यासारखे होतात आणि व्यक्तिगत अभिरुचीमुळे नव्हे तर सामाजिक अलगपणामुळे ती दोघं जवळ येत नाहीत. ह्याला एकतर्फी प्रेम म्हणा, अप्राप्याची आकांक्षा म्हणा, असमाधानातली हुरहुर म्हणा. सौम्यपणे, खालच्या पट्टीत, आक्रस्ताळ्याशिवाय, इतिहासाला वा समाजाला फार बोल न लावता आहे ती स्थिती पत्करलेली दिसते. ”
‘झुलता पूल’ बरोबरच ‘मेमरी’, ‘भजन’, ‘सामना’, ‘दार कुणी उघडत नाही’ आणि ‘बसस्टॉप’ या एकांकिका या संग्रहात वाचायला मिळतील.
Thanks for subscribing!
This email has been registered!