मार्क जॉन्सनच्या बापाच्या डाव्या हातावर प्रेम हा शब्द गोंदवलेला होता; पण त्यामुळे मुलांना बसणारा मार कधी थांबला नाही. जॉन्सनच्या घरातील मुलं शाळेत यायची, ती मार खाऊन, अंगावर माराचे वळ घेऊन; परंतु त्यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, याचा तपास करण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. मार्क त्या फटीमधून खाली घसरला आणि कित्येक वर्षं त्याची अधोगती होत राहिली. ज्या घरात हिंसा आहे, काही दुष्ट गुपितं आहेत, अशा ठिकाणी तो वाढला. लहान वयातच त्याला वाईट सवयी लागल्या. शाळेत त्याचं बस्तान बसलंच नाही. सहा वर्षांचा असताना तो चो-या करू लागला आणि आठव्या वर्षी तो दारू पिऊ लागला. अकराव्या वर्षी त्यानं हेरॉईनची चव चाखली. एक भावनाशील बुद्धिमान मुलगा, पण त्याला योग्य वळण लागलं नाही. जरी आर्ट्स कॉलेज त्याला खुणावत होतं, तरी तो त्या ऐवजी पोर्टलँडच्या तुरुंगात गेला. त्याच्या सरळपणामुळे मादक द्रव्यांचं सेवन आणि गुन्हे यांच्या गर्तेत मार्कची कशी अवनती झाली, याचं अत्यंत प्रामाणिकपणे लिखाण वेस्टेडमध्ये झालं आहे. हेरॉईन आणि व्रॅÂकचं सेवन, लंडनच्या रस्त्यावर बेघर राहणं, त्याला ठार मारण्यासाठी दिलं जाणारं बक्षीस, या अशा परिस्थितीत कुणीही- स्वत: मार्कही आपण जिवंत राहू, अशी आशा करत नव्हता. बरं होणं तर दूरच राहिलं, पण एवढं असून यातून बाहेर पडण्याची शक्ती त्याला मिळाली आणि आता तो आपला ‘झाडांची शल्यचिकित्सा’ हा व्यवसाय जोमात चालवत आहे आणि इतर अशा जंकीजना नोकरीला ठेवून या मादक द्रव्य सेवनातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. त्याची ही कथा तशी बरीच धक्कादायक, पण स्फूर्तिदायक आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी आणि याबरोबर त्याच्यासारख्या इतरांना वाचविण्यासाठी एका माणसानं केलेल्या प्रयत्नांची ही हृदयद्रावक आणि वाचावीशी वाटणारी कथा.