पुंडलिकाने जशी आपल्या आई-वडिलांना बरोबर घेऊन वारी केली व त्यांना
चंद्रभागेत स्नान घातले, वारकरी आज आपल्या आई-वडिलांची तशीच सेवा करताना
दिसतात. 2001 साली आषाढी एकादशीला मी गेलो असताना हे दृश्य मला दिसले.
वारीपरंपरेमध्ये असणारी सेवाभावी वृत्ती या छायाचित्रात पकडता आली याचा मला
आनंद वाटला. छायाचित्रात दिसणारा वृद्ध वारकरी पाणी अंगावर पडताना शांत
चित्ताने डोळे मिटून समाधान अनुभवत होता. पायी वारी केल्यानंतरच्या या स्नानाने
त्यांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते. आठशे वर्षाच्या या वारीपरंपरेचा
छायाचित्रात्मक शोध घेण्याची प्रेरणा या छायाचित्राने मला मिळाली. ‘वारी एक
आनंदयात्रा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर माझी छायाचित्रात दिसणार्या शंकर भैरू
गाडे या गडहिंग्लज तालुक्यातील वारकर्याशी भेट झाली. त्यांना स्नान घालणारी
ती माणसे त्यांच्या कुटुंबातील नव्हती. एवढेच नाही, तर ते त्यांच्या ओळखीचेदेखील
नव्हते, ना ते एका दिंडीतील होते, हे त्यांच्याकडून मला समजले. वडिलधारी
व्यक्ती एकटीच स्नान करताना पाहून ती व्यक्ती आपल्याच कुटुंबातील असे
समजून इतर वारकर्यांनी त्यांना स्नान घातले. रक्ताचे नाते नसतानाही
वडिलधार्या व्यक्तीला आपले वडील समजून स्नान घालताना टिपलेला हा प्रसंग
त्यामुळे एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला.
Wari Ek Anandyatra / वारी एक आनंदयात्रा
Thanks for subscribing!
This email has been registered!