"विज्ञान (मग ते कोणतेही असेल) तसा क्लिष्ट विषय. पण डॉ. बाळ फोंडके यांनी विज्ञानाच्या सर्व शाखांचा सखोल अभ्यास करून त्यावर विपुल लेखन केले आहे. प्रस्तुत ’विज्ञान विशेष’ हे त्यांच्या ग्रंथसंपदेतील एक माहितीपूर्ण पुस्तक. विज्ञानातील पारिभाषिक शब्द न टाळता अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत त्यांनी लेखन केलं आहे. म्हणून ते वाचनीयच नव्हे, तर जिव्हाळ्याचं वाटतं. पंचेंद्रियांद्वारे ज्ञात होणार्या अनेक गोष्टी आपण ’वैज्ञानिक चमत्कार’ या सदरात जमा करतो. त्याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करत नाही. पण कुणी त्यामागची कारणपरंपरा आपल्या ध्यानात आणून दिली, तर ’अच्छा, हे असं आहे तर’ किंवा ’खरंच, हे आपल्याला माहीत असायला हवं’ अशी आपली स्वाभाविक प्रतिक्रिया असते. डॉ. फोंडके यांनी त्यांच्या ’बाबूराव’नामक मित्राला लिहिलेल्या पत्रांद्वारे विज्ञानातील सकृतदर्शनी गूढ वाटणार्या गोष्टी उलगडतात. एखादी गंमत-जंमत सांगावी इतक्या सहजतेने ते बाबूरावांशीच नव्हे, तर वाचकांशी दिलखुलास संवाद साधतात. ’कुतूहल’ आणि ’जिज्ञासा’ ही एकप्रकारे बौद्धिक क्षुधाच असते. अशा पुस्तकाच्या वाचनातून ती कशी शमते, याचा अनुभव वाचकांनी अवश्य घ्यावा... "