‘मेडिसिन्स सान्स फ्रॉन्टिअर्स` या सेवाभावी संस्थेतर्फे डॅमियन ब्राऊन हा तरुण ऑस्ट्रेलियन डॉक्टर स्वयंसेवक म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने आफ्रिकेत पोहोचतो. पण त्याची नेमणूक एका दूर, चहूबाजूंनी भू-सुरुंग पेरलेल्या, सर्वत्र निव्वळ मातीच्या झोपड्या असलेल्या शहरात झालेली असते. या नव्या डॉक्टरसाठी सगळीच परिस्थिती अपरिचित असते. ‘अंगोलन वॉर`चा प्रत्यक्ष अनुभव असणारे, त्याच्या दुप्पट वयाचे, इंग्लिश बोलू न शकणारे आणि पहिल्याच दिवसापासून वितंडवाद घालणारे आरोग्यसेवक त्याच्यासोबत असतात. पण तरी डॅमियन सर्व आव्हानांना धैर्यानं तोंड देतो. तीन स्वयंसेवकांच्या मदतीनं तिथल्या समाजातला असमंजसपणा, तर्कविसंगतता अशा गोष्टींशी लढत राहतो. कधी चित्त्याच्या हल्ल्यात जखमी होणारी माणसं, कधी भू-सुरुंगाचा स्फोट, तर कधी चुलीवर हत्यारं उकळून कराव्या लागणाNया शस्त्रक्रिया अशी आव्हानं सतत त्याच्या पुढ्यात असतात, तरी स्थानिकांशी मैत्री जुळवत तो परिस्थितीवर मात करतो. ‘वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर’ हे अंगोला, मोझाम्बिक आणि दक्षिण सुदान इथल्या वैद्यकीय दुरवस्थेवर प्रकाश टाकणारं प्रभावशाली पुस्तक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मानवहितवादी गट आणि त्यांच्यासाठी काम करणारी- विक्षिप्त; पण असामान्य अशी माणसं, यांच्याबद्दलची प्रामाणिक मत मांडणारं, हे एक हृदयाला भिडणारं पुस्तक आहे.