ही कहाणी आहे सिएरा लिओन देशातल्या छोट्याशा वस्तीत राहणा-या मारिआतू कामाराची. सरकारविरुद्धच्या असंतोषातून बंडखोरांनी पुकारलेल्या युद्धात गावंच्या गावं उद्ध्वस्त होत असतात... संघर्षाच्या वणव्यात निष्पाप रहिवाशांच्या आयुष्याची होळी होत असते... बंडखोर युद्धाच्या उन्मादात निरागस लोकांची हत्या करतात... त्यांचा अनान्वत छळ करतात.अशा युद्धजन्य परिस्थितीच्या दुष्टचक्रात तेरा वर्षांची कोवळी मारिआतू सापडते. युद्धज्वर चढलेले बंडखोर तिचे दोन्ही हात निर्दयपणे छाटून टाकतात. उमलत्या वयातच तिचं आयुष्य विदीर्ण होतं. हालअपेष्टा, आक्रोश, वेदना आणि असाहाय्यता हेच प्राक्तन स्वीकारून तिचा थरारक प्रवास सुरू होतो...परावलंबित्वाकडून स्वावलंबनाकडे...त्या प्रवासाची ही कहाणी! पत्रकार सुसान मॅक्लेलँड यांनी मारिआतूशी अनेक वेळा संवाद साधून तिची ही चित्तथरारक आत्मकथा शब्दांकित केली आहे. आपला यातनादायी प्रवास सांगताना मारिआतूच्या नजरेसमोर असतो, जंगलातला पिकलेला आंबा... जगण्याची उमेद देणारा! मारिआतूनं आपलं आयुष्य फक्त सावरलचं नाही, तर उभारलं... राखेतून झेप घेणा-या फिनिक्ससारखं!