छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम, सेनापती संताजी घोरपडे या चरित्रग्रंथांशिवाय डॉ. जयसिंगराव पवारांनी मराठेशाहीच्या कालखंडावरील अनेक ग्रंथांना आपली विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्यांच्या संशोधन विषयातील विविधता, त्यातून उलगडत जाणारा प्रदीर्घ पट, त्याचे विश्लेषण करतानाची त्यांची बहुआयामी दृष्टी, तसेच भाषिक शैली व ऐतिहासिक संदर्भ यांचा सुयोग्य मिलाफ याची अनुभूती त्यांच्या या प्रस्तावनांच्या संकलनातून येते. या प्रस्तावनांनी इतिहासातील अनेक अंधारे कोनाडे उजळले. त्या घटनेच्या आकलनाच्या वाटा बदलल्या. त्या व्यक्तिरेखांचं चौथं परिमाण मांडलं गेलं. जुन्या गृहितकांना टक्कर देण्यासाठी नव्या अस्मिता निर्माण झाल्या. आणि शेवटी त्यातून त्यांनी प्रबोधन हे अंतिम ध्येय सिद्ध केलं आहे. जयसिंगराव पवारांच्या निवडक प्रस्तावनांच्या संकलनातून घेतलेला इतिहासाचा वेध.