‘विज्ञानकथा’ हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानकथेनं आता चांगलं बाळसं धरलं आहे. आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातल्या शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणारा हा वाङ्मयप्रकार आता लोकप्रिय झालेला आहे. असं डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतंच, शिवाय ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे हे मराठी विज्ञान साहित्यातलं एक मान्यवर नाव. विज्ञानकथा, विज्ञानकादंबरी, विज्ञानलेख असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांच्या अनेक कथांना व कादंबरीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. नॅशनल बुक ट्रस्टनं सर्व भारतीय भाषांमधील विज्ञानकथांचा एक संग्रह प्रकाशित केला आहे. ‘वसुदेवे नेला कृष्ण’ ही त्यांची कथा त्या संग्रहात समाविष्ट केलेली आहे. क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव अशा अनेक विज्ञान विषयांवरच्या त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. ‘अभिहरण’मध्ये परग्रहवासियांच्या भेटीत अडकलेला नायक दिसतो, क्लोनिंगमुळे उडालेली गंमत ‘पिनी’मध्ये बघायला मिळते तर ‘वसुदेवे नेला कृष्ण’मध्ये अतिप्रगत विज्ञान-तंत्रज्ञानामुळे मिळणा-या सुखसोयी आणि त्यासोबतचं मानसिक दास्य नाकारून अपत्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यासाठी कष्ट व धोका पत्करणारे माता-पिता दिसतात. मानवी मूल्यं आणि मानवी भाव-भावना या सर्व कथांच्या केंद्रस्थानी आहेत.