महीमन त्या विलक्षण स्वप्नाने झोपेतून खडबडून जागा झाला होता. तो कोण ऋषिकेश होता, त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या सात दिवसांतल्या नाट्यमय, थरारक, संघर्षाच्या घडामोडी त्यानं स्वप्नात पाहिल्या होत्या. त्यांच्या त्या इमारती, वाहनं, शहरं, कपडे, सर्वकाही अपरिचित होतं; पण तरीही त्या ऋषिकेशबद्दल मनात एक विलक्षण आपुलकी होती.
तो दुष्ट स्वामीजी आणि ऋषिकेश… त्यांच्यातला अखेरचा संघर्ष… महीमनला त्याचा शेवट काय झाला कधी कळणारच नाही. पण हे चमत्कारिक स्वप्न एवढ्यावरच थांबत नव्हतं. त्या ऋषिकेशलाही पाच रात्री लागोपाठ अशी स्वप्नं पडली होती. तोही आधी चकित झाला होता. पण ही स्वप्नं त्याच्यासाठी काहीतरी घेऊन येत होती…
वेगवेगळ्या मार्गावरून जीवनप्रवास करणाऱ्या या सर्व अस्मिता आहेत…. अपवादात्मक परिस्थितीत एकमेकांना ज्ञात झालेल्या… महीमनच शरीर थरारून उठल होत. मग तोही याच साखळीतला होता का? त्यालाही या सर्व शक्ती प्राप्त होणार होत्या का?
या क्षणापर्यंत नीरस, एकसुरी वाटणारं आयुष्य आता एकाएकी सप्तरंगी झालं होतं. मनासमोर त्याने अनेक आकर्षक देखावे रंगवले होते… इतके दिवस तो समजून चालला होता, हे भाबड्या कल्पनांचे चाळे आहेत…
पण आता सर्वकाही बदललं होतं. शक्यतांची मर्यादा एकदम विस्तारली होती. आयुष्यात आव्हानं एकदम विस्तारली होती. महत्त्व जय-पराजयाला नव्हतं. आयुष्य एकाएकी रसरशीत झालं होतं. क्षण आणि क्षण उत्कंठा घेऊन येणार होता.
यापेक्षा जास्त असं काय मागणं असणार?