समकालीन वास्तवाचा जीवनमूल्यांच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावून, ललित साहित्याची निर्मिती करणाया मोजक्या लेखकांमध्ये आपणांस वि. स. खांडेकरांचा समावेश करावा लागतो. किंबहुना त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच मराठी साहित्यातील त्यांचे स्थान अढळ आहे. वि. स. खांडेकरांनी कथात्मक वाङ्मयनिर्मितीबरोबरच अगदी प्रारंभापासून काव्यलेखनही केले आहे. १९१९ ते ७५ या प्रदीर्घ काळात ते अव्याहतपणे कविता लिहीत होते. त्यांच्या काही कविता आणि चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणी त्या त्या काळात गाजलीही होती; परंतु त्यांच्या कवितांचा संग्रह मात्र त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकला नाही. तो योग डॉ. अविनाश आवलगावकर यांच्यामुळे येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. डॉ. आवलगावकर हे मध्ययुगीन साहित्याचे – विशेषत: महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक आहेत; परंतु त्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतले नाही. ते आधुनिक साहित्याचेही अभ्यासक आहेत. स्वत: निर्मितिशील कलावंत आहेत आणि त्यामुळेच त्यांना वि.स. खांडेकरांच्या कवितेविषयी ओढ वाटली असणार, हे उघड आहे. यातूनच त्यांनी अतिशय परिश्रमाने आणि संशोधकवृत्तीने खांडेकरांच्या कविता संपादित केल्या आहेत. त्यास विस्तृत विवेचक प्रस्तावनाही जोडली आहे. खांडेकरांच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर १९२० नंतरच्या मराठी साहित्याचा अभ्यास करणायांना हा ग्रंथ फार फार उपयोगी ठरणार आहे. –नागनाथ कोत्तापल्ले