‘महाराष्ट्र टाइम्स’ ह्या वृत्तपत्रात ‘मध्यम’ (१९८८) सदरातील स्फुटलेखांचा हा संग्रह ‘उत्तम मध्यम’ या नावाने आता प्रसिद्ध होत आहे.
ज्ञानकोश आणि शब्दकोश यांच्या मधला हा एक वेगळाच लेखनप्रकार आहे. श्री.बांचे स्फुटलेखन वाचत असताना आपण अक्षरश: अचंबित होतो; आणि नकळत आपलीही बहुश्रुततेची, ज्ञानाची पातळी उंचावते, त्यांचे अफाट वाचन, विलक्षण स्मरणशक्ती, उपस्थिती यांचा आल्हाददायी प्रत्यय या संग्रहात पानोपानी येतो. त्यांच्या वाचनाला आणि धारणेला अक्षरश: सीमा नाहीत. वाचन हा त्यांचा प्राण आहे, जगणे आहे, त्याला विषयाच्या मर्यादा नाहीत, भाषेच्या भिंती नाहीत. मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांचे तर ते प्रभु आहेतच, पण बंगाली, गुजराती... आदी भाषासागरात ते लीलया विहरतात.
श्री.बांना ‘ग्रंथोपजीवी’ हे विशेषण अधिक साजेलसे आहे. त्यांची लिहिण्याची शैलीही प्रौढ, रोचक आहे. ज्ञानप्रौढत्वाबरोबर श्री.बांमध्ये जातिवंत रसिकता आहे, मिश्कीलताही आहे.
अनेक घरचे पाणी प्यालेल्या त्यांच्या भाषेला तिचा असा वेगळाच डौल आहे.