१९२८ तीन तरुणी भारतात यायला निघतात. प्रत्येकीचे येण्याचे कारण वेगवेगळे असते. नव्या आयुष्याबद्दलच्या अपेक्षा, इच्छा आणि आकांक्षा भिन्न असतात. बॉम्बेला रोझचं लग्न एका इंग्रज अधिकाऱ्याशी होणार असतं, पण सोबत आई-वडील नसल्याने एका अनोळखी माणसाशी अनोळखी प्रदेशात लग्न करायचा ताण तिच्या मनावर येतो. इंग्लंडमध्ये लग्न जमत नाही म्हणून व्हिक्टोरियाची आई व्हिक्टोरियाला जोडीदार शोधण्यासाठी रोझसोबत भारतात पाठवते, तर लेखिका होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी व्हिवा, तिच्यावर ओझे झालेल्या भूतकाळाची मुळे शोधायला भारतात येते. बॉम्बेमधील उच्चभ्रू समाज, गरीब वस्त्या, भारतातले इंग्रज, त्यांची भारताबद्दलची मते, तत्कालीन भारतीय समाजाची इंग्रजांबद्दलची मते, भारतीय स्वातंत्र्यलढा अशा व्यापक पाश्र्वभूमीवर विणलेला हा कादंबरीचा पट खिळवून ठेवतो.