वुदरिंग हाईट्स एक गूढ हवेली
एमिली ब्रॉंटे
अनुवाद :- रेखा शिराळकर
वुदरिंग हाईट्स ही क्लासिक कादंबरी भाषांतरीत करण्याचे मला का सुचले याचा मी आत्ता विचार करते आहे. तसे पाहिले तर मी एक सर्वसामान्य स्त्री आहे. माझ्याकडे साहित्याची कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही आणि साधारणपणे मी मराठी पुस्तकांचेच वाचन करते, इंग्लिश पुस्तके अगदी क्वचितच वाचते. एके दिवशी सहज म्हणून वाचण्यासाठी घरातच काही शोधत होते. परंतु वाचण्याची पटकन इच्छा व्हावी असे मराठी पुस्तक माझ्या हातात आले नाही. मग मी हे इंग्लिश पुस्तक उचलले. सहज चाळता चाळता लक्षात आलं की बोजड शब्द, क्लिष्ट जुन्या पद्धतीचे इंग्लिश, लांब लांब वाक्य रचना... यामुळे ही कादंबरी वाचणे मला कठीणच गेले. मी ती कादंबरी बाजूला ठेवली. परत मी काही दिवसांनी विचार केला की एवढी गाजलेली कादंबरी व आपण ती वाचत नाही है बरोबर नाही. मग मी अवसान आणून ऑक्सफर्ड डिक्षनरी घेऊन वाचण्याचा प्रयत्न केला. २-४ पाने वाचल्यानंतर मी निर्धारच केला की कादंबरी संपूर्ण वाचायचीच. आणि अक्षरशः भारावल्यासारखी मी ही कादंबरी संपूर्ण वाचून काढली. कादंबरीने मला पुरते झपाटून टाकले. अतिशय वेगळा विषय, वेगळ्या प्रकारची हाताळणी... कादंबरीच्या संमोहनातून मी बाहेर पडू शकले नाही. नंतर काही दिवसांनी माझ्या मनात आले की ही कादंबरी परत वाचून त्याचा मराठीत अनुवाद करावा. आणि मी बैठक धरून बसले व अनुवाद पूर्ण केला. अनुवाद वाचल्यानंतर आपल्या मित्र परिवाराला देखील या कादंबरीचा अनुभव द्यावा असा विचार डोक्यात आला.
हा कादंबरीचा शब्दशः अनुवाद नसून जुन्या पद्धतीच्या भाषेतला क्लिष्टपणा काढून, परंतु मतितार्थ तोच ठेवून मी हा अनुवाद केलेला आहे. कादंबरीचा काळच वेगळा, समाजच वेगळा, संस्कृती देखील वेगळी. पण ती आता वाचताना देखील परकी किंवा उपरी वाटू नये इतपत काळजी घेऊन त्यानुसार वाक्यरचना बदलून तिचे मराठीत हे रूपांतर केले आहे. त्यामध्ये एक गोष्ट आहे की, मूळ कादंबरीत असलेली अंगावर येणारी शिवराळ व रासवट भाषा मी जशीच्या तशी वापरलेली नाही. त्यामुळे अनुवादीत कादंबरी जरा सौम्य झाली असेल. परंतु त्यामुळे संपूर्ण कादंबरीस काही बाया आली आहे असे नाही. १८४६-४७ साली लिहिलेली एमिली ब्रॉंटे यांची ही कादंबरी नंतर जगप्रसिद्ध झाली. त्यावर पूर्वी सिनेमा सुद्धा काढला गेला आहे. अपेक्षा आहे की हा अनुवाद वाचून आपणालाही माझ्याइतकाच आनंद मिळेल
Thanks for subscribing!
This email has been registered!