मि. ब्रेथवेट, नवे शिक्षक. त्यांनी आपल्या वर्गातील मुलांना शरमेनं मान खाली घालायला लावली. त्यांच्याशी झटापट केली, प्रसंगी कुस्तीसुद्धा खेळली. हळूहळू त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला आणि एक दिवस स्वत:च त्या मुलांवर निरतिशय प्रेम करू लागले. त्यांच्या वर्गातील गुंडगिरी करणारी, निर्ढावलेली मुलं त्यांना ‘सर’ म्हणून आदरानं हाक मारू लागली. त्या मुलांच्या गलिच्छ वस्तीतल्या पोरींना सन्मानानं ‘मिस्’ म्हणायलाही सरांनीच शिकवलं. त्या मुलांना हात स्वच्छ धुवायला शिकवलं आणि त्याचबरोबर शेक्सपिअरसुद्धा वाचायला शिकवलं. एका ध्येयानं प्रेरित झालेल्या शिक्षकानं रागाचं, द्वेषाचं, तिरस्काराचं रूपांतर प्रेमात केलं. पौगंडावस्थेतील बंडखोरीचं रूपांतर आत्मविश्वासात केलं. दुस-यांच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा असतो, हे त्या मुलांना शिकवलं. हा त्यांचा विजय होता. एका शिक्षकाच्या तळमळीचा, विद्याथ्र्यांविषयी वाटणाऱ्या कळकळीचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रेमाचा...