पात्रयोजना, कथानक, विषय आणि पाश्र्वभूमी या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरणा-या जेफ्री आर्चर यांच्या कथांचा हा संग्रह. या सर्वच कथांतून जेफ्री आर्चर यांच्या लेखणीचे कसब आणि लालित्य दिसून येते. प्रत्येक वाचकाला या कथासंग्रहात स्वतःच्या पसंतीची एकतरी कथा हमखास सापडेल. यात रेल्वेस्टेशनवर समोरासमोरच्या प्लॅटफॉर्मवर झालेली नजरानजर व त्यातून फुलून आलेली प्रेमकथा आहे; प्रचंड आत्मविश्वासाने खेळलेल्या बाजीची कथा आहे, कायद्याला हवे तसे वाकवणा-या कायदेतज्ज्ञाची कथा आहे. तसेच, एका तरुणीची अत्यंत विलक्षण, सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. शेवटची ‘द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर’ अर्थात ‘दुरून डोंगर साजरे’ ही सर्वोत्कृष्ट म्हणावी अशी कथा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटाला जेफ्री आर्चर यांनी एक नाट्यपूर्ण कलाटणी दिलेली आहे. म्हणूनच हा शेवट धक्कादायक वाटतो. यातील अनेक विस्मयकारक कथा या सत्यघटनेवर आधारित आहेत.