या पुस्तकात लेखिकेने स्वत:चा घर-परिवार अन् त्यातील जबाबदाऱ्यांसोबतच भारतीय महिला विविध क्षेत्रांत नुसते काम नाहीतर पथदर्शक कामगिरी पार पाडू शकतात, हे सिद्ध करणाऱ्या महिलांशी मनमोकळे हितगुज केलेले आहे. भारतातील आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या या महिलांनी सांगितले की, वादळ-वाऱ्यात, ऊन-पावसात अत्यंत कठीण समयी कोणत्या तत्त्वांच्या आधारे त्या ठाम राहिल्या त्यांना कोठून प्रेरणा मिळाली. या महिलांनी तेव्हा सर्व प्रकारच्या विपरित परिस्थितींचा सामना केला, प्रसंगी हालपेष्टा सोसल्य़ा, लिंगभेदामुळे अपमान गिळले. यामुळेच त्या-त्या क्षेत्रातील कवाडे पुढील पिढीतील महिलांसाठी खुली झाली आहेत. या महिलांनी जागतिक क्रमवारीत स्थान पटकावलेले आहे. सर्वच क्षेत्रांतील अग्रणी तुमच्या भेटीला आलेल्या आहेत. धवलक्रांतीत मोलाचा सहभाग असलेल्या अम्रिता पटेल, औषध निर्मीती अन् संशोधन क्षेत्रातील किरण मुझुमदार, बँकिंग क्षेत्रातील कल्पना मोरपारिया, शिखा शर्मा, नैनालाल किडवाई, उद्योग क्षेत्रातील अनु आगा, मेहेर पद्मजी, मल्लिका श्रीनिवासन, प्रिया पॉल, लीला पुनावाला, विनीता बाली, कला क्षेत्रातील मल्लिका साराभाई, शुभा मुद्गल आणि सामाजिक क्षेत्रातील शाहिन मिस्त्री, क्रिडाक्षेत्रातील पी.टी. उषा यांतील प्रत्येक जण आपापल्या कार्यात शिखराला पोहचलेल्या असून प्रत्येकीचे जीवन फारच प्रेरणादायी आहे; पण सर्वांत महत्त्वाचे नमूद करावेसे वाटते, ते म्हणजे प्रत्येकीने आपापली सामाजिक जाणीव जागृत ठेवून त्यानुसार भरीव काम केलेले आहे. यातील प्रत्येकीचाच प्रवास रोलकोस्टर राइडसारखा चित्तथरारक असून तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनातून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाचे दर्शन तर होईलच, पण यशस्वी होण्याच्या त्रिकालाबाधीत सत्य असलेले गुपित देखील उमजेल.