‘भवरलाल, ही दगडाधोंड्यांची ओसाडी विकत घेऊन तू काय करणार आहेस? या दगडांच्या वांझ शरीरातून काही उगवेल तरी का?’ त्यांच्या मनाने त्यांना जाब विचारला. पण व्यवहारी मनाच्या आत एक सृजनशील अंतर्मन दडले होते. त्याने सांगितले, ‘तू हे करच. कारण केवळ तूच हे करू शकशील. तूच या निकामी पथ्थरातून एक संजीवक स्वप्नशिल्प निर्माण करू शकशील.’ ही संजीवक कहाणी आहे, ओसाडीतून नंदनवन निर्मिणा-या, पाण्याच्या थेंबाथेंबातून जीवन देऊन शेतक-यांना समृद्ध करणा-या, भूमी व भूमिपुत्रांवर प्रेम करणा-या पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन या महापुरुषाची! त्यांनी केलेल्या संघर्षाची. निर्माण केलेल्या वेगळ्या वाटेची. श्रम, बुद्धी, संस्कार आणि निसर्ग प्रेमाच्या महामंत्राची आणि त्यातून निर्माण झालेल्या उत्तुंग यशाची!