गाभा अंधाराचा अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातल्या, अत्याधुनिक, नावीन्यपूर्ण सजावटीच्या आपल्या छानदार ऑफिसमध्ये अमेरिकेतला एक मान्यवर, अतिश्रीमंत, पण अतिशय रागीट असा वृद्ध उद्योगपती, ट्रॉय फेलन, आपलं मृत्युपत्र लिहीत होता. त्याचा मृत्यू पुढे काही तासांवरच होता. त्याला त्याच्या मुलांना, त्याच्या सोडचिठ्ठ्या दिलेल्या बायकांना आणि जवळपासच्या बगलबच्च्यांना एक संदेश द्यायचा होता, की ज्यामुळे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला न्यायालयात उभा राहणार होता. कित्येकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती. कारण ट्रॉय फेलनच्या नवीन मृत्युपत्रात तो आपली अकरा बिलियन डॉलर्सची मिळकत ब्राझीलच्या अति दुर्गम अशा निबिड जंगलात राहून आदिवासींची सेवा आणि धर्मप्रसाराचे काम करणा-या अज्ञात अशा रॅचेल लेन नावाच्या एका वारसाला देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार होता. व्यसनमुक्तीकेंद्रातून नेट ओ रायले नुकताच बाहेर पडला होता. वैद्यकीय क्षेत्रात उपचारासंबंधी डॉक्टरांनी दाखवलेल्या निष्काळजीपणाबद्दल खटले चालवण्यात नेटने चांगलं नाव मिळवलं होतं. पण व्यसनापायी त्याला ब-याच वेळा बदनामीला सामोरं जावं लागलं होतं. अशा या नेटवर रॅचेल लेनला शोधून काढण्याचं काम सोपवलं होतं. ट्रॉय फेलनचे वारसदार त्याच्या मिळकतीवर गिधाडासारखे घिरट्या मारत होते. ब्राझीलच्या जंगलात जिथे पैशांना काही किंमत नव्हती तिथे नेट, रॅचेलच्या शोधासाठी धडपडत होता. जिथे किंचितशा चुकीमुळे मृत्युशीच गाठ पडायची अशा परिस्थितीत या महिला धर्मोपदेशक डॉक्टर रॅचेलला मित्र आणि शत्रू या दोन्ही पक्षातल्या लोकांनी भरपूर मनस्ताप दिलेला होता. ती स्वत:सुद्धा इतरांना एक आश्चर्याचा धक्का देणार होती.