ड्रेक अॅन्ड स्वीनी या वॉशिंग्टन डी.सी.मधल्या बलाढ्य लॉ फर्ममधला वकील मायकेल ब्रॉक हा आपल्या क्लायंट्सना तासावर बिलं लावतो आहे, पैसा कमावतो आहे. यशाच्या आणि सत्तेच्या पाय-या चढण्यासाठी अथक प्रयत्न करतो आहे. फर्मची भागीदारी फक्त एका पावलावर असताना त्याला हे सारं नकोसं वाटतं आणि एका क्षणात सारं होत्याचं नव्हतं होतं. एक बेघर माणूस फर्मच्या अलिशान ऑफिसमध्ये घुसून नऊ वकिलांना ओलीस धरतो. ते ओलीस नाट्य संपतं, तेव्हा मायकेलचा चेहरा त्या माणसाच्या रक्तानं थबथबलेला असतो आणि अचानक, मनात विचारसुद्धा येणार नाही, अशी गोष्ट करायला मायकेल तयार होतो. अनेक वर्षांपूर्वी हरवलेल्या त्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा त्याला परत एकदा शोध लागतो. मायकेल त्याची बलाढ्य फर्म सोडून, त्याचा हल्लेखोर जिथं कधीकाळी राहत होता, त्या रस्त्यांवर जायला तयार होतो. त्या रस्त्यांवर राहणा-या समाजातल्या दुर्बलांना, न्याय मिळवण्यासाठी वकिलाची गरज असते. पण अजून एक कोडं आहे, जे मायकेल सोडवू शकत नाही. ड्रेक अॅन्ड स्वीनीच्या अथांग गर्तेतून, आता मायकेलच्या हातात पडलेल्या एका गुप्त फाइलमधून एक रहस्य तरंगत वर येऊ पाहतं. एक कटकारस्थान शिजलंय, ज्यानं काही लोकांचा बळी घेतलाय. आता मायकेलचे पूर्वीचे भागीदार त्याचे कट्टर शत्रू झाले आहेत, कारण त्यांच्यासाठी मायकेल ब्रॉक हा रस्त्यावरचा सर्वांत धोकादायक माणूस झालेला असतो.