फ्रान्सिस ड्रेक. १६व्या शतकातला दर्यावर्दी आणि सागरी लुटारू; पण इंग्लंडच्या राणीने आश्रय दिलेला. सागरीमार्गाने पृथ्वी प्रदक्षिणेला तो निघाला होता. त्याने आपल्या प्रवासाचा तपशीलवार वृत्तांत लिहून ठेवला होता, अशी समजूत आहे. १७ एप्रिल, १९०६. कॉलिफोर्निआतल्या मरिन काउंटितल्या `सान क्विल्टॉन प्रिझन` मधला एक कैदी – अर्ल ह्युबर, याला योगायोगानं तुरुंगाखालच्या भुयाराचा शोध लागला. ह्युबरनं त्या भुयाराचा माग काढला आणि त्याच्या टोकाला पोहोचल्यावर, मातीतून पडणा-या सोन्याच्या नाण्यांनी तो न्हाऊन निघाला. – आणि त्याचवेळी तिथून पाच मैलांवर उद्ध्वस्ततेनं थैमान घातलं. सान फ्रान्सिस्को. १९७५. सॅम बोगार्डस. एक वकील. जेनिफर डॅवीज हीही एक वकीलच. तिनं काही चर्मपत्रांची पानं बोगार्डस समोर ठेवली आणि त्यांच्या आधारे आपल्या जन्मदात्या बापाचा शोध घ्यायची विनंती सॅमला केली. तीन वेगवेगळ्या कालखंडांतल्या ह्या घटनांचा परस्परसंबंध दर्शनी तरी काहीच दिसत नाही. पण तो आहे! त्या संबंधाचीच ही शोधकथा. शोध घेता घेता वाचकाला एका अद्भुत ठिकाणी घेऊन जाणारी; जिथं दडलं आहे काळाला आजवर अज्ञात असलेलं एक लोकविलक्षण गूढ. अनेक खुनांना आमंत्रण देणारं एक रहस्य! एक विलक्षण रोमांचक, उत्कंठापूर्ण रहस्यकथा. त्यासाठी उघडायला हवं – `द सिमीऑन चेम्बर!`