आयुष्याची पस्तीस वर्षे चाकोरीबाहेरची कामे करण्यात खर्ची घातल्यानंतर मागे वळून पाहण्याचा आणि केलेल्या कामांचा लेखाजोगा मांडण्याचा हा प्रयत्न आहे. प्रकाशनाच्या क्षेत्रात सहकारी प्रकाश संस्था,
मराठवाड्यात ज्ञानाची सदावर्ते उघडणारी ग्रंथालय चळवळ,
निधारांसाठी वृद्धांश्रम, अपंग मूकबधिरांसाठी निवासी शाळा,
गावाच्या विकासासाठी पाणलोट क्षेत्र प्रकल्प,
आप्तस्वकीयांना आर्थिक बळ प्राप्त व्हावं म्हणून कुक्कुटपालन,
सरकारी दवाखाण्यातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाचे डबे पुरवणे,
शरीर मनाच्या स्वास्थासाठी कार्य करणार्या सिद्ध समाधी योग संस्थेच्या पाठीशी आर्थिक बळ उभं करणं,
अशा अनेक प्रयोगांच्या यशापयशाच्या कहाण्या या पुस्तकात शब्दबद्ध झाल्या आहेत.
दुसर्यांसाठी झिजण्यात आनंद नक्कीच आहे; पण समाजसेवा म्हणजे लष्कराच्या भाकर्या भाजणे हेही एक कटू वास्तव आहे.
नवे रचण्यासाठी आर्थिक-मानसिक गुंतवणूक करायची,
आपले उमेदीचे वय, तारुण्याची ऊर्जा पणाला लावायची,
आपल्या छंदांसाठी सोरे कुटुंब वेठीला धरायचे आणि ज्यांच्यासाठी करायचे त्यांनी मात्र त्यात स्वार्थाचा विचार पहायचा, दूषणे द्यायची.
अशा वाळवंटात प्रयोग करण्यात काय अर्थ आहे,
असेच कुणालाही वाटेल. पण या उफराट्या अनुभवांची कटुता मात्र या लेखनात कुठेही नाही.
निर्मितीची घुसमट, नवे घडविण्यात झालेली दमछाक आणि आपणच रचलेले, मोडलेले पाहताना होणार्या यातना हे सर्व असूनही या पुस्तकात कुठेही निराशा नाही, कुणावर राग नाही, आगपाखड नाही.
उतलो नाही, मातलो नाही, घेतला वसा नेकीने पुढे नेला, आवाक्याबाहेर गेला सोडून दिला. गुंतवणुकीत कमी पडायचं नाही आणि बाहेर पडताना व्याकूळ व्हायचं, नाही इतका सरळ मामला.
संसार म्हणजे गुंतवणूक आणि आध्यात्म म्हणजे सोडवणूक असं एक वचन आहे, बाबा भांड यांच्या पुस्तकाचे हेच मध्यवर्ती आशयसूत्र आहे. आंबट कैरी पिकली की गोडच लागले, तसेच काहीसे या अनुभव कथनाचे झाले असावे.