जगदीश कदम यांची 'ओले मूळ भेदी' ही कादंबरी शेतकरी, कष्टकरी माणसाच्या वर्तमान जगण्यातील भीषणतेचे चित्रण करते. तशीच ती वर्तमान स्थितीचा नवा मतितार्थही मांडते. शेती हा व्यवसाय कसा तोट्यात चालतो, शेतीच्या तुकड्यावर जगताना कशी 'दमछाक होते हे सांगतानाच नव्या परिवर्तनाची हाक दारात येऊन थांबलेली आहे. याचे सूचनही ही कादंबरी करते. शेतीला चिकटून असलेली पारंपरिक पध्दतीने शेती करणारी पिढी आणि नव्या दृष्टीने शेतीकडे पाहू इच्छिणारी पिढी यांतील द्वंद्व या कादंबरीत येते. शेती व्यवसायातील समूहाने बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेतल्याशिवाय मार्गक्रमण करणे कठीण आहे, याकडे ही कादंबरी लक्ष वेधते.
ग्रामीण पातळीवरील मतलबी वृत्तीच्या राजकारणाचे डावपेच, नातेसंबंधातील वाढत चाललेला गुंता यांवर ही कादंबरी प्रकाश टाकते. मुळातच कादंबरीचे लेखक हे कवी असल्यामुळे कादंबरीच्या भाषेचे प्रवाहीपण नजरेत भरण्यासारखे आहे. कृषिव्यवस्थेतील वर्तमानाचा वेध घेणाऱ्या या कादंबरीच्या माध्यमातून जगदीश कदम हे कादंबरीच्या प्रांतात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवतील, असा विश्वास वाटतो.
Thanks for subscribing!
This email has been registered!