‘‘मी एकटी नाही. मी म्हणजे अनेकजण आहोत.
मी म्हणजे जगातील सगळ्या मुली आहेत.
ज्यांनी अजून शाळेचा उंबरा ओलांडला नाही. त्या शाळेबाहेरच आहेत.
आज निम्मं जग उद्योगधंद्यांच्या प्रगतीनं आधुनिकतेची
अन् प्रगतीची फळं चाखत आहे;
पण निम्मं जग गरिबी, भूकबळी, अन्याय आणि जगण्याचा
संघर्ष करत आहे. पहिल्या जागतिक युद्धास शंभर वर्षं होत आहेत;
पण या युद्धाच्या विनाशाचा धडा आम्ही आजपर्यंत शिकलो नाही.
आधुनिक काळात मानवानं चंद्रापर्यंत झेप घेतली आहे.
मानवीशक्ती आणि तंत्रज्ञानापुढं आज काहीच अशक्य नाही.
जगातील सगळ्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा
आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे.
जगातील एकही मूल शाळेशिवाय राहणार नाही,
बालकामगार म्हणून त्याचं शोषण होणार नाही,
बालविवाहाचे शिकार बनणार नाही,
युद्धात त्यांची आहुती पडणार नाही,
मुलांना शिकविणे हा गुन्हा ठरणार नाही,
या उज्ज्वल भविष्याची ज्योत आताच पेटवू या.
मित्रांनो, या! आताचीच ही वेळ आहे.’’
(नोबेल पारितोषिक स्वीकारल्यानंतर मलालाने केलेल्या भाषणातून.)