जगातल्या नावाजलेल्या कंपन्या म्हणून ज्यांचा आज आपण सर्वार्थाने उल्लेख करतो त्या कंपन्यांनी आपली सुरुवात कशी दुर्दम्य इच्छा व दृढ विश्वासाच्या बळावर केली, हे या पुस्तकातून अत्यंत साध्या-सोप्या भाषेत लेखनबद्ध झाले आहे.
यामुळे आपली कंपनीकडे बघण्याची दृष्टी कशी सकारात्मक बनते आणि जागतिक अर्थव्यवस्थेला भक्कम बनवण्यास या कंपन्या कसा हातभार लावतात,
हे सहजपणे नजरेत भरते.
या सबंध कंपन्या आज अनन्यसाधारण म्हणून गणल्या जातात; परंतु प्रत्येक कंपनीला प्रारंभकाळी खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले हेही तेवढेच सत्य.
या जगप्रसिद्ध कंपन्यांनी मानवीजीवन सुकर आणि उन्नत करण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे.
अशा निवडक बत्तीस कंपन्यांचे व्हिजन, त्यांची व्यवस्थापकीय शैली यांचा हा धांडोळा केवळ रंजकच नव्हे तर विलक्षण उद्बोधक ठरेल असाच आहे.
यात आइस्क्रीम, शीतपेयांपासून विमाने तयार करणार्या कंपन्यांसोबतच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या काही कंपन्यांचाही समावेश आहे.
कंपन्यांच्या यशोगाथा म्हणजे केवळ वार्षिक उलाढाल किंवा नफा यांच्या आकड्यांचा चढता आलेख नव्हे.
म्हणूनच आकडेवारीत गुंतून न पडता दूरदृष्टी, कल्पकता, बदलत्या परिथितीशी जुळवून घेण्याची तत्परता अशा अनेक गुणांची चर्चा प्रस्तुत पुस्तकात आहे.
टाटा ग्रूप, महिंद्रा अॅेण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, द बोइंग, आयबीएम, रिलायंस ग्रूप, जॉन्सन अॅरण्ड जॉन्सन, सॅमसंग, फोर्ड मोटार, टोयोटा मोटार, सिंगर, अॅसपल, इन्फोसिस, फेसबुक आदी अनेकविध प्रकारच्या उत्पादक कंपन्यांनी सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतले आहे, हे या कंपन्यांच्या यशाचे रहस्य होय.
व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी, उद्योजक आणि प्रगतीबाबत जागरूक असणार्या प्रत्येकास या यशकथा निश्चितच प्रेरणादायी आहेत.
मनाच्या कक्षा रुंदावणारे हे लेखन प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.