जगाच्या वेगवेगळ्या भागात प्रवास नि वास्तव्य करत असताना लेखकास समाजाच्या विविध स्तरातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटल्या. त्यात आफ्रिकेतील आदिवासी ते एखाद्या प्रगत राष्ट्राचे अध्यक्ष किंवा रस्त्याच्या कडेला बसून बूट-पॉलिश करणाऱ्या पोऱ्यापासून ते अतिधनाढ्य व्यावसायिक अशा विभिन्न स्तरातील लोक होते. अशा व्यक्ती, परदेशात आलेले मनोरंजक, अनुभव देशोदेशींची वैविध्यपूर्ण संस्कृती, चालीरिती, श्रद्धा-अंध:श्रद्धा यांच्या निरीक्षणातून साकार झाल्या ‘एक होता मित्र...’मधील साऱ्या कथा! त्या वाचताना लेखक वाचकास जगाच्या दुर्गम भागात नि अनोख्या विश्वात फेरफटका मारून आणण्यासाठी घेऊन जात आहे, असा भास व्हावा. काही कथा वाचकांस चकीत करतील, तर काही व्यथित! काही आहेत मिश्कील, तर काही अंतर्मुख करणाऱ्या . यातील कथानके जरी जगाच्या वेगवेगळ्या भागात उलगडत गेली असली, जरी त्यात भिकाऱ्यांपासून धनिकांची किंवा मंत्र्यांपासून मांत्रिकांची व्यक्तिचित्रे आढळले, जरी त्या गुन्हेगारी, अत्याचार ते राजकारण अशा विषयांभोवती गुंफल्या असल्या, तरी या वैविध्यात एक समान धागा आहे – लेखकाने आपले अनुभव साध्या व सोप्या भाषेत पण नाट्यमय नि उत्कंठावर्धक शैलीत मांडण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न!