‘एक दिवस’ ते ‘असाही एक दिवस’ या अकरा ललित लेखांचा संग्रह म्हणजे शोभा चित्रे यांच्या सातत्याने चाललेल्या संवेदनशील धडपडीचा आलेख आहे. अमेरिकेत ४० वर्षांहून अधिक काळ राहूनसुद्धा आपल्या मातीवरील, माणसांवरील, भाषेवरील प्रेम विरळ न होऊ देता ‘तिथल्या’ आणि ‘इथल्या’ संस्कृतींना अनुभवाच्या माध्यमात जोडून मराठी साहित्य समृद्ध करण्याचा त्यांचा अनाहूत प्रयत्न, साध्या, सोप्या, सरळ भाषेतून वाचकांशी संवाद साधत त्यांच्या हृदयाचा नकळत ठाव घेण्याची त्यांची वृत्ती, आणि संयत व शांत स्वभावाच्या लेखनातून त्यांनी शमविलेली वादळे अथवा निर्माण केलेली खळबळ – या सगळ्याचा एक विलोभनीय चित्रपट या संग्रहात पाहायला मिळतो. मराठी साहित्यात त्यांच्या लेखनातून उतरणारे हे वेगळे अनुभवविश्व यापुढेही वाचकाला खुणावीत राहील; भुरळ घालील.