ग्रीक दंतकथेतील प्रॉमिथिअस म्हणजे मानव कल्याणार्थ व्यथा, वेदना सहन करून साहसाने मनुष्य संस्कृतीचा विकास करणारा दिव्यापुरुष होय. वि. स. खांडेकरांना महात्मा गांधींचं जीवन व व्यक्तिमत्व हे प्रॉमिथिअससारखं वाटत आलंय. ते गांधीजींना विसाव्या शतकातील प्रॉमिथिअस मानत. त्या अर्थाने गांधीजी दुसरे प्रॉमिथिअस होत. खांडेकरांनी गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेल्या या संग्रहातील लेखकातून गांधीजी प्रॉमिथिअसची तळमळ घेऊन आपणापुढे येतात. सारा देश मूल्यहासाने होरपळत असताना सदाचाराची सदाफुली रुजवणारे गांधींची व्यक्तिमत्व या लेखातून वाचकांच्या मनात आशेची नवी उर्मी निर्माण करतात. गांधीजींचे जीवन व विचार नव्या अंगाने समजावून सांगणारा खांडेकरांचा हा लेखसंग्रह कर्मकान्डांच्या जागी कर्मयोग रूजवू इच्छिणाया वाचकाच्या मनात सामाजिक धर्मबुद्धी जागवणारं आगळं महात्मायन होय. धर्म, जात, देश इत्यादी संदर्भातील संकीर्ण जाणिवा जोपासू पहाणाया मूलतत्त्ववादी विचारांचा पराभव घडवून आणायचा तर हा `दुसरा प्रॉमिथिअस` समजून घ्यायलाच हवा.