प्रज्ञासूर्य, बोधिसत्त्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अखिल जगताला मिळालेला ज्ञानप्रकाश आहे. मोठ्या व्यक्तीच्या जीवनावर आजपर्यंत असंख्य ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अनेकविध ग्रंथकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तित्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु चरित्रात्मक कादंबरीच्या रूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र रेखाटून व. न. इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील साहित्यात मोलाची भर टाकली आहे.
कादंबरी वाचत असताना डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, विविध पैलू आणि वैशिष्ट्ये जशी वाचकांसमोर येतात त्याचप्रमाणे त्यांच्या अंतरंगातील ओढाताण, व्यथावेदना आणि घालमेल यांचेही प्रत्ययकारी दर्शन वाचकाला होते. अस्पृश्यतेच्या प्रश्नांची क्लिष्टता, भयानकता व व्याप्ती तसेच तिचे येथील ग्रामव्यवस्थेत, अर्थव्यवस्थेत व धर्मव्यवस्थेत अडकलेले धागेदोरे अनेक बोलक्या प्रसंगांमधून स्पष्ट केले गेले आहेत. बालपणापासून ते बॅरिस्टरी मिळवून मायदेशी परत आल्यानंतरच्या टप्प्यापर्यंत बाबासाहेबांना अस्पृश्यतेचे स्वरूप किती भीषण आहे, याची उत्तरोत्तर जाणीव होत गेली. या त्यांच्या जाणिवेचा रेखीव आलेख ही या पुस्तकातील महत्त्वाची जमेची बाजू म्हणता येईल. अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांनाही इतरांप्रमाणेच समाजात मानाचे स्थान मिळावे, अभिमानाने जगता यावे, त्यांचा उद्धार व्हावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा संघर्ष वाचकाला कमालीचा अस्वस्थ करतो, अंतर्मुख करतो.