कथेतील पात्रांच्या चित्रीकरणातून पशु पक्षांच्या भावनांचा माणसांच्या स्वभावाशी मिळताजुळता वेध घेतला आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून साथ केली आहे. आपल्या अवतिभोवती अनेक पशु पक्षी गुण्यागोविंदाने बागडताना दिसतात, पण उपद्रवी मनुष्यच त्यांचे जगणे बागडणे एका क्षणात नष्ट करतो. पक्ष्याच्या सवयी आणि शरीराची रचना यावर त्याचे निवासस्थान अवलंबून असते. तसे चिमणी धिटाईने वाळत घातलेले धान्य टिपते, कावळा मनुष्याजातीजवळ बिनधास्तपणे राहतो. प्रत्येक पशु पक्षाच्या वागणुकीची एक त-हा , एक लकब असते असे या पुस्तकातून दिसून येते. या कथांमधून प्राण्यांनी जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड आणि कधीकधी हतबल होऊन जीवनासाठी चाललेला संघर्ष दिसून येतो. मुलांना पशु-पक्ष्याविषयी जिज्ञासा, प्रेम वाटायला लावणारे हे पुस्तक आहे.