मानवी समाज हा एकरूप किंवा एकजीव नाही तर या समाजाचे दोन विचित्र भाग आहेत. एका भागाची चैन दुसया भागाच्या कष्टांवर उभारली आहे; इतकी या भागांमध्ये विषमता आहे. ही दोन सर्वस्वी भिन्न विश्वे आहेत. या दोन विश्वांतील माणसे कितीही जवळजवळ वावरत असली, तरी त्यांच्यामध्ये दोन ध्रुवांचे अंतर आहे. स्त्री आणि दलित या दोन्हींवर होणारे अन्याय हे अशाच विषमतेचा भाग आहेत. कोकणातील खेड्यामधील पाश्र्वभूमीवर बेतलेली ‘दोन ध्रुव’ ही कादंबरी याच भयंकर विषमतेवर आधारित सामाजिक जीवनाचे चित्रण करते. धर्म आणि संस्कृती यांच्या नावाने केलेल्या पद्धतशीर पिळवणुकीची लक्षणे अज्ञान, दारिद्र्य आणि अस्पृश्यता यावर यामध्ये प्रकाश टाकला आहे.