दुसऱ्या महायुद्धात नाझी राजवटीने मानवतेवर केलेले भीषण अत्याचार सांगणारी ही अधिकृत सत्यावर आधारलेली कहाणी आहे.
न्यूरेम्बर्ग येथे नाझी डॉक्टरांवर युद्धगुन्ह्यांसाठी जो खटला चालवला गेला त्याचे अमेरिकी लष्करातर्फे वार्तांकन करणाऱ्या स्त्रीने ही डोळ्याने पाहिलेली कहाणी सांगितलेली आहे.
शास्त्रीय संशोधन अन् देशभक्ती यांच्या बुरख्याखाली निरपराध व्यक्तींचा छळ आणि खून करण्यात आले.
डॉक्टर्स फ्रॉम हेल यामध्ये काही आम जनतेला उपलब्ध नसलेली खटल्याची कागदपत्रेही समाविष्ट केलेली आहेत;
तसेच या खटल्यात पुरावा म्हणून सादर झालेले, आजवर प्रकाशात न आलेले फोटोही दिलेले आहेत.
यात लेखिकेने बॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या, धोकादायक असलेल्या युद्धानंतरच्या न्यूरेम्बर्ग शहरात राहतानाचे अनुभव सांगितलेत.
खटल्यावर काम करताना तिचे तिथे अठरा महिने वास्तव्य होते.
एकदा एका नाझी माथेफिरूने ती राहत असलेल्या हॉटेलवर बॉम्ब टाकला.
काही क्षणातच ती तिथे जेवण्यासाठी पोहोचणार होती. या पुस्तकात ती आपल्याला प्रत्यक्ष खटले चालू असलेल्या न्यायालयाच्या सभागृहात नेते, साक्षीदारांनी दिलेले जबाब ऐकवते, बळींच्या प्रतिक्रिया, त्यांचे राग-लोभ आदी भावना शब्दांतून आपल्यापर्यंत पोहोचवते.
तिथे नरसंहारातून वाचलेले कैदी आपल्यावर केलेल्या प्रयोगांच्या कहाण्या सांगतात, त्यांना प्राणवायूपासून वंचित केले गेले, बर्फात ठेवले गेले, त्यांना मलेरिया, टायफस, कावीळ आदी रोगांचे जंतू टोचले गेले, त्यांचे निरोगी हातपाय कापले गेले.
त्यांना सक्तीने दिवसेंदिवस फक्त समुद्री पाण्यावर ठेवले गेले.
असे अनेक अत्याचार केले गेले.
या ऐतिहासिक खटल्याची परिणती म्हणून नंतर न्यूरेम्बर्ग कोड लिखितस्वरूपात अस्तित्वात आले.
मानवावर वैद्यकीय संशोधन करताना कोणती नीतिमूल्ये पाळावित याची मार्गदर्शक तत्त्वे त्यात ठरवलेली आहेत.
ही कादंबरी दुसऱ्या महायुद्धावरील साहित्यात महत्त्वाची भर घालते; तसेच नरसंहार, मानवी हक्क,
वैद्यकीय नीतिमूल्ये आणि एकूणच मानव किती पशुत्वाच्या पातळीवर घसरू शकतो याबद्दलही सांगते.