‘डिस्क्लोजर’ ही मायकेल क्रिश्टनची नवी कादंबरी. या कादंबरीतून त्यानं माणूस नावाच्या प्राण्याच्या अथांग भावविश्वाचा वेध घेतला आहे. ‘डिजिकॉम’ ही एक कॉम्प्युटर कंपनी... गळेकापू औद्योगिक स्पर्धेत जिवाच्या करारानं धावणारी... टॉम सँडर्स या गुणी अधिकाऱ्यायाला डावलून, या कंपनीच्या सर्वोच्च पदावर विराजमान होते सौंदर्यवती मेरेडिथ जॉन्सन... विशेष म्हणजे, हे दोघेही कधीकाळी परस्परांच्या प्रेमपाशात गुंतलेले असतात. आणि तरीही अचानक मेरेडिथ, सँडर्सनं आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप ठेवते... भूत आणि वर्तमानाच्या सीमारेषा अकस्मात अलगद एकमेकींत मिसळू लागतात... या आरोपाच्या सावटातून निसटण्याचा सँडर्स आटोकाट प्रयत्न करू लागतो. आणि एक मानसनाट्य आकार घेऊ लागतं... स्त्री-पुरुष संबंधांतल्या चकव्यांमधून निर्माण होणारं आणि औद्योगिक शर्यतींमधूनही... मुखवटे गळून पडू लागतात, आधुनिक जगाची एक क्रूर बाजू उघडी पडू लागते... गतिमान काळाच्या झंझावाती प्रवाहात वेगानं बदलत चाललेल्या स्त्री-पुरुषांमधल्या नात्यांची अत्याधुनिक कहाणी... ‘डिस्क्लोजर!’