‘ध्वनिताचें केणें’ हा प्रा. मा. ना. आचार्य यांचा नवा लेखसंग्रह त्यांच्या आजवरच्या लौकिकात भर घालील असाच आहे. यातही त्यांनी दैवकथांचा अभ्यास, मिथकांचा अभ्यास, संहिताचिकित्सा, अर्थान्वयन इत्यादी नव्या अंगांनी ज्ञानदेवी, महाभारत, रामायण, भागवत आणि संतवाङ्मय यांचा शोध घेतला आहे. ‘ध्वनिताचें केणें’ म्हणजे गूढार्थाचे गाठोडे. ज्ञानदेवीमध्ये अथवा प्राचीन साहित्यामध्ये त्याच्या वरवरच्या अर्थापेक्षा गुह्य, सूचित अर्थाच्या जागा भरपूर आहेत. आचार्यांनी अतिशय तीक्ष्ण नजरेने त्या जागा हेरून वाचकांसमोर त्या गुह्यार्थाची गाठोडी सोडून ठेवली आहेत. ग्रंथातील सर्वच लेखांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे संशोधनाची बैठक. आपले हे संशोधन करत असताना पूर्वसुरी आणि समकालीन अशा सर्व अभ्यासकांची मते प्रा. आचार्यांनी विचारात घेतली आहेत. एक सुविहित, दक्षतापूर्वक केलेले असे हे संशोधन महाराष्ट्रातील सर्व अभ्यासकांना मान्य होईल ही अपेक्षा.
Thanks for subscribing!
This email has been registered!