देवा असं कसं रे हे मन? असं कसं? बहिणाबाईचा प्रश्न रोजच आठवत राहतो. माणसाचं मन! एका अद्भुत रसायनाचं गाठोडंच. माणूस हा विश्वाच्या पसाऱ्यामधलाच एक अंश. पण देवाने त्याला मन दिलं, बुद्धी दिली आणि वाणीही दिली. देवाने निसर्गापेक्षाही माणसाने श्रेष्ठ बनावे म्हणून तर ही आयुधे दिली नसतील? पण नेमकी तीच आयुधे माणसाला कमजोर करून गेली. निसर्ग साधाच सरळ रितीने जगू लागला आणि माणूस मात्र या आयुधांनी स्वत:च स्वत:ला दु:खी करून घेऊ लागला. निसर्गाला मन, बुद्धी, वाचा नाही. पण भावना जरूर आहेत. या भावनेच्या बळावरच निसर्ग सारे ताकदीने निभावून जातो. आघात, प्रपात, वादळ, वारे, विजा, पाऊस, उन्हाळा, थंडी, पतझड सारे निसर्ग निश्चलपणे झेलतो. या सर्व प्रचंड प्रक्रियेत एक विलक्षण समजूतदारपणा आहे. गळून पडलेल्या पानांकडे वृक्ष किती तटस्थपणाने पाहतो? "इदं न मम?" अशी तटस्थ वृत्ती आली की, दु:खच संपेल, पण अशी वृत्ती येतच नाही. तर पुन:पुन्हा आपण तिथेच उरतो आणि "तेहि नो दिवसा: गत:!"या व्यथेतच बुडून जातो. म्हणजे पुन्हा भूतकाळ व भूतकाळ कितीही प्रिय वा अप्रिय असो - परत थोडाच येतो? मलाही हे सारे समजत होतेच... पण भूतकाळाचे उदास सावट मनावरून काही केल्या उतरत नाही. विक्रम राजाच्या पाठीवरच्या वेताळासारखा... हा भूतकाळ पाठीवरून उठायला तयार नाही...