हातात पुटकी कवडीही नसलेला अनाथ मुलगा, कच्छमधल्या वाळवंटातल्या अत्यंत गरीब परिस्थितीतून धडपडत वर येत येत संपत्ती व कीर्ती मिळवून मुंबईचा ‘कॉटन विंग’ कसा होतो, याचं चित्रण या कादंबरीत हातोटीने करण्यात आलं आहे. शिवाय १८५७ सालच्या हिंदुस्थानच्या पहिल्या स्वातंत्र्यसमरापासून सन १९४७मध्ये स्वातंत्र्याची पहाट उगवेपर्यंतचा अत्यंत चित्तथरारक कालखंडही यात प्रत्ययकारी पद्धतीने रेखाटला आहे. यात त-हेत-हेच्या मनोवेधक, धीट, कणखर मनाच्या, उत्साही व्यक्ती भेटतात – व्यापारसम्राट, राजे-महाराजे, गणिका, अचूक भाकितं सांगणारा योगी, समुद्रावरचे चाचे, स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिश राज्यकर्ते... ही एका अनावर प्रेमाच्या अटळ शोकान्तिकेचीही कहाणी आहे – यात चित्रण आहे, एका धैर्यवान, चारित्र्यवान माणसाचं, त्याच्या अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचं, विलक्षण उदार मनाचं, आणि मानवसुलभ मानसिक दौर्बल्याचंही... थक्क करून टाकणारी लालजी लखाची विलक्षण कथा खिळवून ठेवते!