मार्च-एप्रिल २००७ मधल्या एका आठवड्यात एकमेकांना अजिबात न ओळखणा-या तीन माणसांच्या आरोग्याच्या संदर्भात सर्वस्वी अनपेक्षित अशा घटना घडल्या. ह्या घटनांमध्ये दोघांचा जीव गेला आणि शिवाय हजारो लोकांच्या जीवनांवर गंभीर परिणाम झाले. या घटनांमध्ये बळी पडलेल्या लोकांना असं काही होणार, याची पुसटशीही कल्पना नव्हती. या तिघांमधला एक गोरा डॉक्टर होता. दुसरा आफ्रिकन-अमेरिकन असून तो कॉम्प्युटर प्रोग्रॅमर होता. तिसरा माणूस आशियाई वंशाचा होता. व्यवसायानं अकाउंटंट असणा-या या तिस-याची निर्घृण हत्या झाली होती.