संत नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंकडे सुभाष देशपांडे अतिशय मोकळेपणे पाहतात. त्यांचे कवित्व, त्यांची भक्ती, त्यांनी केलेली कीर्तनाची प्रस्थापना, श्रीविठ्ठलासंबंधीचा अनन्य भक्तिभाव, नाममाहात्म्य, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले सामंजस्य अशा अनेक पैलूंचा ते सविस्तरपणे निर्देश करतात. आणखी दोन बाबी त्यांना अधिक महत्त्वाच्या वाटतात. समाजस्थितीचे त्यांचे सूक्ष्म आकलन आणि समाजातल्या शोषितांच्या उद्धाराची त्यांची अपार तळमळ. या दोन गोष्टींमुळेच त्यांचे कार्य आणि त्यांची कविता अजरामर झाली. असे नेमके आणि नेटके आकलन केल्यामुळेच हा ग्रंथ संत नामदेवांच्या अभ्यासकांसाठी अतिशय मोलाचा झाला आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!