विज्ञानानं कितीही वाटचाल केली, कितीही प्रगती साधली, जीवनशैली कितीही बदलली- तरी मानवी स्वभावावर, त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपावर त्याचा प्रभाव पडणार नाही. विज्ञानाच्या या वाटचालीवरची त्याची प्रतिक्रिया ही मानवी स्वभावाच्या खास वैशिष्ट्यांनुसार, त्यातील गुणदोषांनुसारच होणार आहे. फार तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंच्या बाह्य आविष्काराचं स्वरूप बदलेल; पण त्यांचा मानवी भावजीवनावरचा पगडा कायमच राहणार आहे. विज्ञानकथा ज्या वैज्ञानिक सूत्रांचं बोट धरून वाटचाल करतात, अशी सूत्रं तशी मर्यादितच आहेत. कालप्रवासी, अवकाशप्रवास, परठाहावरील जीवसृष्टी, अंतराळयुद्ध, यंत्रमानव वगैरे कल्पना शेकडो विज्ञानकथांमध्ये पुनःपुन्हा वापरलेल्या आढळतात आणि तरीही प्रत्येक कथा स्वतंत्र आणि वेगळी, स्वतःचे वैशिष्ट्य असलेली असते. एकाच कल्पनेवर आधारलेल्या कथा वेगवेगळ्या असू शकतात. डॉ. बाळ फोंडके यांच्या या संठाहातील बहुतांश कथांवर या सर्व दृष्टिकोनाचा प्रभाव आहे.