पौगंडावस्था हा माणसाच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. पौगंडावस्था म्हणजे मानवी मनोव्यापारांच्या उत्कट भावांदोलनांची सुरुवात असते. तर अशा या उत्कट भावांदोलनांचं वास्तव आणि व्यामिश्र चित्रण ‘चिकनसूप फॉर टीन एज सोल भाग २’मधील कथांमध्ये केलं आहे. यातील काही कथा पौगंडावस्थेतील प्रेमभावना अधोरेखित करतात, तर काही प्रेमातील विफलता अधोरेखित करतात. काही कथा करुण रसाचा प्रत्यय देतात, तर काही हळुवारपणाचा. पौगंडावस्थेतील मुलांनाही विपरीत परिस्थितीला सामोरं जावं लागतं, असाही सूर काही कथांमधून दिसतो. जसं व्यसनी पालक वाट्याला येणं, त्यांचे अत्याचार सोसायला लागणं, आई-वडिलांचा घटस्फोट, आई किंवा वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर सावत्र आई किंवा सावत्र वडिलांकडून छळ सोसावा लागणे, पाठच्या भावंडांची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागणे, भावंडांपैकी कोणाला कॅन्सर झाल्यामुळे ते दु:ख बघायला लागणे, आई-वडिलांपैकी कोणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे दु:ख होणे अशा वास्तवतेचाही प्रत्यय देणाऱ्या काही कथा आहेत. त्या मनाला चटका लावून जातात. यातील काही कथा अतूट मैत्रीच्या आहेत. तर काही मैत्रीत आलेल्या वितुष्टाच्याही आहेत. यातून मैत्र भावनेतील उत्कटता आणि मैत्री तुटल्यानंतर झालेलं दु:ख अशा दोन्ही छटा चित्रित केल्या आहेत. पौगंडावस्थेतील मुलांच्या भावविश्वाचं दर्शन घडवणाऱ्या या कथांचं हे संकलन वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरच्या भावभावनांचं उत्कट दर्शन घडवतं. साध्या, सोप्या भाषेतील या कथा वाचनीय अशाच आहेत.