कोणतंही दु:ख पचविण्यासाठी माणसाला आवश्यक असते सकारात्मकता. केवळ दु:ख पचविण्यासाठी नाही तर आहे त्या आर्थिक परिस्थितीत सुख मानणे, आनंदात राहणे यासाठीही सकारात्मकतेची गरज असते. प्रत्येकाच्या अंगी अशी सकारात्मकता असेलच नाही. त्यामुळे ज्या माणसांकडे अशी सकारात्मकता असते त्या व्यक्तींचं वेगळेपण जाणवतं. तर अशा होकारात्मक लोकांच्या कथा त्यांनी स्वत:च कथन केल्या आहेत ‘चिकनसूप फॉर द सोल टफ टाइम्स टफ पीपल भाग २’मधून. थोड्या पैशांतून समाधान कसं मिळवायचं इथपासून घराला आग लागून वस्तूंसहित सगळं घर जळालेलं असताना स्वत:चं मन शांत कसं ठेवायचं, आईला कॅन्सर झालेला असताना केमोथेरपीमुळे तिचे केस गळतील म्हणून तिचे केस कापताना कसं हसायचं आणि आईलाही हसवायचं यांसारख्या प्रसंगांतूनही हे पुस्तक मन:शक्तीचा प्रत्यय देतं. कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा त्या गोष्टीचं प्रमाण कमी असताना, कोणताही दु:खद प्रसंग ओढवल्यावरही आनंदी राहण्याचा संदेश या पुस्तकातून मिळतो. तर खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारं आणि जगण्यासाठी ऊर्जा देणारं हे पुस्तक अवश्य वाचायला पाहिजे.