या पुस्तकातील डॉक्टरांच्या कथा विलक्षण अशा आहेत. वैद्यकीय विश्वाचे अंतरंग त्यातून अलगदपणे उलगडत जाते. डॉक्टर हा देखील ‘माणूस’ असतो, देव नसतो, याचे भान देण्याचे काम त्यातील घटना-प्रसंग देतात. यातील काही प्रसंग खळाळून हसायला लावतात तर काही डोळे ओलावून जातात. नवजात बालकांचे जन्म, व्याधी-वेदनांची शारीरिक आणि मानसिक तीव्रता, निखळ माणुसकीचे दर्शन, कर्तव्यपूर्तीसाठीचा असीम त्याग, बुद्धिमत्तेची झलक, चकित करणारी लीनता; असे विविध कंगोरे या कथांतून प्रत्ययास येतात. रुग्णांच्या शोकांतिका हृदय पिळवटून टाकतात. तसेच डॉक्टरांच्या हृदयांची विशालता नजर विस्फारून टाकते. हे प्रसंग आणि घटना डॉक्टर्स आणि रुग्ण यांतील नाते दृढ करण्यास समर्थ ठरू शकतात. हाताची पाची बोटे सारखी नसतात, हा अनुभव आला की डॉक्टर मंडळींविषयी जे काही गैरसमज आहेत, ते दूर करण्याचे काम हे पुस्तक खचितच करील.