संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती. अपुर्या आणि चुकीच्या ऐतिहासिक साधनांमुळे संभाजीराजांची प्रतिमा डागाळलेल्या स्वरूपात समोर आली. संभाजीराजे हे व्यसनी, स्त्रीलंपट, क्रूर आणि बेजबाबदार होते, असं चित्र या चुकीच्या साधनांमुळे निर्माण झालं; पण कालांतराने काही असेही पुरावे उपलब्ध झाले, ज्या पुराव्यांमुळे संभाजीराजांवरील आरोपांमध्ये तथ्य नव्हतं, हे सत्य समोर आलं. तर इतिहासकारांनी, नाटककारांनी, साहित्यिकांनी, ललित लेखकांनी जुन्या-नव्या साधनांच्या आधारे संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध, त्यातून होणारं संभाजीराजांचं दर्शन आणि त्यांच्या व्यक्तिचित्रणातील सत्यासत्यता याची सविस्तर आणि ससंदर्भ चर्चा करणारं पुस्तक आहे ’छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ.’