ई-कॉमर्स, उद्योजकता आणि आपल्या खरेदीच्या सवयी
आणि जीवनशैलीला संपूर्णत: नवं स्वरूप देणाऱ्या भारताच्या
सर्वात मोठ्या स्टार्टअपचा विश्वासार्ह वृत्तान्त,
आय.आय.टी. पदवीधर सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल ह्या दोघांनी बंगलोरमधील एका
घरातून चालू केलेलं 'फ्लिपकार्ट' पुढे भारतातील सर्वात मोठं ई-कॉमर्स स्टार्ट अप बनलं.
ऑक्टोबर २००७ मध्ये स्थापन झालेल्या फ्लिपकार्टची सुरुवातीची ओळख 'ऑनलाइन
बुकस्टोअर'अशी होती. लवकरच फ्लिपकार्ट 'ग्राहकांच्या खुशीचा ध्यास असलेली कंपनी'
म्हणून प्रसिद्ध झाली. स्टार्टअपचं नाव होत गेलं, तसतसं तिचं मूल्यांकनही वाढत गेलं.
धाडसी महत्त्वाकांक्षा, चंगळवादाला निःसंदिग्ध प्रोत्साहन आणि तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर
करणाऱ्या कंपनीमध्ये भरीव गुंतवणूक करण्यासाठी भारतीय, तसंच परदेशी व्हेंचर
कॅपिटॅलिस्टच्या रांगा लागल्या.
काही थोड्याच वर्षांच्या कालावधीत बन्सलनी फ्लिपकार्टचं अब्जावधी डॉलर्सची उलाढाल
असणाऱ्या बलाढ्य कंपनीत परिवर्तन कसं केलं आणि इंटरनेट उद्योजकतेला एक
अत्याकर्षक व्यवसायाचा दर्जा कसा मिळवून दिला ह्याची चित्तवेधक कहाणी शोध पत्रकार
मिहिर दलाल यांनी उलगडली आहे. ही कहाणी अफाट संपत्ती, ताकद आणि आत्यंतिक
महत्त्वाकांक्षा याचीही आहे. व्यावसायिक आणि परस्परसंबंधांमधील गुंतागुंत ह्यामुळे
संस्थापकांचा त्यांच्या निर्मितीवरील ताबा सुटत गेला आणि अखेरीस शून्यातून उभी केलेली
कंपनी त्यांना विकून टाकावी लागली. आणि तीही कोणाला, तर ज्या कंपनीच्या एकाधिकारी
वर्चस्वाचं अनुकरण करायची स्वप्नं पाहिली त्याच कंपनीला! फ्लिपकार्टच्या लिलावामध्ये
व्यावसायिक जगतातील बडे मोहरे -जेफ बोझोज, सत्या नादेला, सुंदर पिचाईपासून थेट
मासायोशी सन आणि डग मॅकमिलनपर्यंत- सामील झाले होते. ह्यावरून बन्सलच्या
ताकदीची कल्पना करता येते.
.
असाधारण संशोधन, असंख्य विस्तृत मुलाखती आणि फ्लिपकार्टच्या कहाणीतील
अतिमहत्त्वाच्या पात्रांबरोबर सहज संपर्क, अशा पायावर रचलेलं 'बिग बिलियन स्टार्टअप' हे
पुस्तक वाचकाला सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी भारताची सर्वात मोठी इंटरनेट कंपनी कशी
उभारली आणि नंतर विकून टाकली ह्याचा चित्तवेधक आणि खिळवणारा प्रवास घडवतं.