मुस्लिम आक्रमणापुर्वी भारताचे जगावरील प्रभाव, ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीबाबत भारत देश कसा श्रेष्ठ होता, यावर प्रशांत पोळ यांनी 'भारतीय ज्ञानाचा खजिना' यावर लिखाण केले आहे. पेशावर/रावळपिंडीपासून ते जावा-सुमात्रा (इंडोनेशिया) पर्यंतच्या भूभागावर बाराशे वर्षे संस्कृत भाषा बोलली जात असे. तक्षशिला विद्यापीठाचा जगभरात दबदबा होता. जहाजबांधणीपासून वैद्यकशास्त्रापर्यंत आणि खगोलशास्त्रापासून धातूशास्त्रापर्यंत असे सुमारे २५ विषय तिथे शिकवले जायचे, अशी माहिती यात दिली आहे. त्याचप्रमाणे मगध राज्यातील (आताचे बिहार ) नालंदा विद्यापीठाबद्दल सांगितले आहे. शिक्षण आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक होता. निर्यातीचा वाटा २९ टक्के होता. आजतागायत हा विक्रम अबाधित आहे, असा दावा करीत युरोपियन इतिहासतज्ञांनी तशा नोंदी इतिहासात करून ठेवल्या असल्याचे लेखकाचे म्हणणे आहे. कर्नाटकातील हंपी शहर, ऋग्वेद ग्रंथ, १ ते ६४ अशा अंकात लिहिलेला सिरीभूवलय ग्रंथ, 'कटपयादी' संख्या संकल्पना, याशिवाय आणखीही बरीच वैशिष्ट्यपूर्ण माहिती पुस्तकात आहे.