भारतातल्या नेतृत्वाचा विकास राजकीय वंचिततेपासून राजकीय भागीदारीपर्यंत झालेला दिसतो. राजकीय नेतृत्व वंचितता, प्रतिनिधित्व, धुरीणत्व, वर्चस्व अशा सैद्धान्तिक चौकटींमध्ये विकसित होत जाते. विकासाच्या प्रक्रियेतल्या या लक्षवेधक संकल्पना हाच या पुस्तकाचा मध्यवर्ती आशय आहे. त्यामुळे या पुस्तकात भारतीय नेतृत्वाचा अर्थ विविध कंगोर्यांसह चित्तवेधक स्वरूपात मांडलेला आहे. वास्तविक, नेतृत्वाची संपूर्ण संकल्पना सध्या केवळ ‘विभूतीपूजा’ किंवा ‘तुच्छतादर्शक विशेषणे’ अशा दोन मनोरंजक चौकटींमध्ये बंदिस्त झाली आहे.
कॉंग्रेसच्या नेतृत्वात धुरीणत्व आणि वर्चस्व उदारमतवादाच्या अंगाने येते. कॉंग्रेसला समांतर हिंदुत्ववादी पक्षांचे नेतृत्व आदर्शवाद ते समरसता अशा चौकटीत विकसित होत असतानाच उच्च वर्गीय स्वरूप धारण करते. तर या नेतृत्वामध्ये प्रतिनिधित्व प्राप्त होत नाही म्हणून ज्योती बसू, माणिक सरकार आणि आम आदमी असे नेतृत्वाचे नवे धुमारे दिसतात.
थोडक्यात, नेतृत्व संकल्पनेच्या अशा सर्वसमावेशकतेमुळे राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहेच, पण ‘राजकारण’ या विषयात रस असणार्या प्रत्येकासाठीही ‘नेतृत्व’ संकल्पनेची व्यापक ओळख करून देण्यासाठी हे पुस्तक अनिवार्य ठरते
Thanks for subscribing!
This email has been registered!