प्रत्येकावर परिणाम करणारं परराष्ट्र धोरण
स्वयंपाकाचा गॅस व पेट्रोल- डिझेलच्या किमती, शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान तसंच सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये अन्न खरेदी करण्याची प्रक्रिया यांसारख्या बाबींवर परराष्ट्र धोरणाचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे या संदर्भातील निर्णय आता शासन घेत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर विभागीय व्यापार संघ ठिकठिकाणी निर्माण झालेले असल्यामुळे, आंतरराष्ट्रीय संघटनांचे महत्त्व वाढत असल्यामुळे राष्ट्रांना त्यांचं अनुसरण करण्यावाचून पर्याय नाही. हे लक्षात घेता समाजातील सर्वच घटकांना परराष्ट्र धोरणाची माहिती असणं आवश्यक झालं आहे. या दृष्टिकोनातून ' भारताचे परराष्ट्र धोरण: नवीन प्रवाह' या पुस्तकात डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी भारताची आंतरराष्ट्रीय धोरणं तसंच महत्त्वाच्या जागतिक घडामोडींबद्दल अभ्यासपूर्ण व सुलभ भाषेत मांडणी केली आहे.
या पुस्तकात १३७ लेख असून भारतव शेजारील राष्ट्रांबद्दल परराष्ट्र धोरणविषयक मांडणी करताना इतरही उपयुक्त माहिती, ट्बल्स व नकाशांचा समावेश हे या पुस्तकाचं बलस्थान आहे. लेखक डॉ. देवळाणकर हे परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केली आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक मोलाची माहिती देणारं ठरेल. या शिवाय परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी , प्राध्यापक आणि या विषयांवर लिखाण करणाऱ्या पत्रकारांनाही याचा उपयोग होऊ शकेल.
Thanks for subscribing!
This email has been registered!