भारतीय समाजविज्ञानाच्या सहाव्या खंडात बदललेल्या सहस्रकातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या लेखांचे संकलन केले आहे. बदललेल्या सहस्रकातील राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणाने जागतिक पातळीवर किती वेगवान आणि धक्कादायक बदल घडवून आणले आहेत, याची प्रामुख्याने दखल या कोशात घेण्यात आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात श्रीमंतांच्या संख्येत झालेली वाढ, तेवढ्याच गतीने श्रीमंत व गरीब या दोन वर्गातील रुंदावत चाललेली दरी, तसेच शेतीक्षेत्रामध्ये झालेली क्रांती आणि त्याचवेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात झालेली वाढ हा विरोधाभास सदर कोशातून टिपला आहे. आर्थिक क्षेत्रातील बदल व नवीन क्रांतिकारक घडामोडींची अद्ययावत नोंद घेतली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, बिनसरकारी संस्थांच्या खाजगी कामांची नोंद, या कोशातून घेण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी होणाऱ्या स्त्रियांमुळे कुटुंबव्यवस्थेवर अटळपणे होणारे परिणाम, जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग), वसुंधरा बचाव, यांसारख्या चळवळीला प्राप्त झालेले विशेष महत्त्व, दहशतवाद या मुद्द्यांकडेही या कोशात लक्ष वेधण्यात आले आहे.