प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या उपासना पद्धती अस्तित्वात होत्या. त्यात प्रामुख्याने मातृदेवतांचे स्थान महत्वाचे होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मातृदेवतांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधीत कथाही आढळतात. या कथांनाच आपण पुराकथा किंवा मिथक या नावाने संबोधतो . मिथकांची निर्मिती प्रथम व्यक्तीच्या अर्धसुप्त मनात होते. ते एक प्रकारचे त्याचे स्वप्नच असते. अशी स्वप्ने सारेच पाहू लागले की, त्याचे रुपांतर मिथकामध्ये होते. म्हणूनच मिथकांना समूहाचे स्वप्न असेही म्हणतात. अशा स्वप्नांची जुळवणी म्हणजे संस्कृतीची नवनिर्मिती असते. ही निर्मिती करताना आपल्या विरोधी गटातील संस्कृतीला हीन लेखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून खरी माहिती सामान्य माणसापर्यंत न जाता, ज्याचे वर्चस्व समाजावर असते; त्याच्या संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या मिथकांचा प्रभाव वाढविला जातो.