रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी... याच रूढीपरंपरांचा आणखी एक बळी म्हणजे जोग्या! ग्रामीण भागात असे देवीला वाहिलेले किती तरी जोगते आढळतात. यांचं जीवन देवदासीपेक्षाही भयावह...! देवदासी झुलवा लावू शकते. एखाद्या पुरुषाची रखेल म्हणून राहू शकते. ती मेली, तर प्रेताला माणसं जमतात. कुणाच्या तरी बांधाला जागा मिळते; पण जोगत्याच्या तिरडीला माणूसच मिळणं कठीण... त्याचा स्पर्शही इंगळीसारखा... त्याच्या नशिबी फक्त अंधार... तोही पुरुषासारखा पुरुष असतो; पण रूढीपरंपरांच्या ओझ्यानं त्याला सगळंच गमवावं लागतं. हाच या कादंबरीचा विषय आहे. या कादंबरीचा नायक आपल्या वेदना व्यक्त करताना म्हणतो– ‘मला देवाला सोडलं, तवा सगळं व्हंत. आगदी तुमच्यावाणी... देवाच्या वझ्यानं पिडून खाल्लं आनी माझ्यातलं सगळंच कव्वा सपलं, माझं मलाच कळलं न्हाई... परतेक देवाच्या जोग्याचं आसंच हाय. सांगून पटत न्हाई... दाकवाय तर ईत न्हाई... आमचं सगळंच फटकुरागत...!’ लेखकानं या जीवनाची समस्या मोठ्या ताकदीनं या कादंबरीत मांडली आहे. जोगत्याच्या जीवनाबरोबरच चौंडक्या, मेळ्यातल्या जोगतिणी यांचं एक विश्वच या कादंबरीनं वाचकासमोर उभं केलं आहे. ही कादंबरी वाचकाला सुन्न करून सोडते, विचार करावयास लावते. हेच कादंबरीचं यश आहे.