सातेक वर्षांच्या बिट्टूच्या घरी एक दिवस अनोळखी पाहुणा अवतरतो. भारदस्त शरीरयष्टी आणि डोक्यावर रूबाबदार हॅट असणारा घोडेस्वार (शेन) बिट्टूच्या घरच्या पाहुणचाराने जणू कुटुंबाचा सदस्यच होऊन जातो. पण तरीही त्याच्याभोवतीचं गूढ वलय तसंच असतं. हा पाहुणा त्या घरच्या सुखदु:खांसोबत तिथली संकटंही स्वत:च्या खांद्यावर पेलतो. बिट्टूच्या कुटुंबाच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या जमीनदाराची त्या कुटुंबप्रमुखावर मारेकरी घालण्याची योजना तो हाणून पाडतो आणि त्या जमीनदारालाही संपवतो. बिट्टूसोबत तर त्याचं खास जिवाभावाचं नातं जडतं. अभिजात अमेरिकन साहित्यातील सर्वांत रोमॅन्टिक हिरो ठरलेला हा शेन आणि बिट्टूच्या कुटुंबाच्या नितळ स्नेहाची ही हृद्य कहाणी... मनाला भिडणारी.